मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीनं फेसबूक पोस्ट टाकली होती. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर टीका केल्यामुळे शिवसैनिकांनी टीका करणाऱ्याचे टक्कल करत त्याला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. हिरामणी तिवारी असे पीडित तरुणाचे नाव आहे.
उद्धव ठाकरे आम्हाला श्रद्धास्थानी आहेत. त्यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट लिहून कुणी आक्षेपार्ह भाषा वापरत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असे बजावत स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर व अन्य शिवसैनिकांनी हिरामणी तिवारी यांना घराजवळच गाठले व त्यांना मारहाण करण्यात आली. जुगदर यांनी हिरामणी यांच्या कानशिलात लगावतानाच त्याचे मुंडणही केले.
जामिया मध्ये झालेल्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केल्याप्रकरणी मी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. ही तुलना चुकीची आहे अशा आशयाची पोस्ट मी टाकली होती. त्यानंतर 25-30 माणसांनी मला मारहाण केली आणि मुंडन केलं. असं तिवारी यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
BBC मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणास आता राजकीय रंग चढू लागला आहे. या प्रकरणी शिवसैनिकांवर कारवाई व्हावी म्हणून भाजपने आक्रमक भूमिका घेतली.भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, महाराष्ट्रात दहशत पसरली आहे. दादागिरी सुरू आहे. केस कापणारे लोक व्हीडिओत दिसत आहेत. ते काही चंद्र किंवा मंगळावरचे नाहीत. पोलीस शांत का बसलेत? जर हा व्हीडिओ खरा आहे, तर धमक्या देणाऱ्यांवर कारवाई का नाही? कारवाई नाही केली तर आम्ही राज्यपाल आणि न्यायालयात जाऊ. दहशत आणि दराऱ्यातलं अंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेत्यांना समजावून सांगावं. त्यांची पक्षावरची पकड गेली आहे आणि कायदा सुव्यवस्थेवरचीही.’ दरम्यान, किरीट सोमय्या यांनी नुकतीच हिरामणी तिवारी यांची भेट देखील घेतली आहे.