मंगेश ताकाटे,
नाशिक : देवळाली कॅम्प येथील पोलीस कर्मचा-यास सायबर भामट्यांनी चांगलाच दणका दिला आहे. भाजी बाजारात चोरीस गेलेल्या मोबाइलच्या माध्यमातून भामट्यांनी पोलिसाचे बँक खाते रिकामे केले असून ही रक्कम फोन पे आणि युपीआय आयडीवरून परस्पर कोलकत्ता येथील एका बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. या घटनेने सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करणारे पोलीसही सुरक्षीत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सखाराम सरकटे (रा. पोलीस कॉर्टर बिल्डींग, देवळाली कॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सरकटे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अंमलदार पदावर कार्यरत असून गेल्या रविवारी (दि.२) ते भाजीपाला खरेदी करण्यासाठी देवळाली कॅम्प येथील आठवडे बाजारात गेले होते. गर्दीत चोरट्यांनी हात की सफाई दाखवत त्यांच्या ओपो कंपनीच्या मोबाइलवर डल्ला मारला. हा प्रकार सरकटे घरी परतल्यानंतर उघडकीस आला. दुस-या दिवशी ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या तयारीत असतानाच चोरट्यांनी सरकटे यांना दुसरा धक्का दिला. मध्यरात्री भामट्यांनी मोबाइलमधील फोन पे आणि युपीआय आयडीचा वापर करून सरकटे यांच्या बँक खात्यातील ९९ हजार रूपयांची रक्कम परस्पर कलकत्ता येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या दोन खात्यांवर वर्ग करून घेतली. त्यानंतर दुस-या दिवशी पुन्हा ९६० रूपयांची ऑनलाईन खरेदी करण्यात आल्याने अंमलदार असलेल्या सरकटे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिवाजी अहिरे करीत आहेत.