जेथे फोडल्या होत्या काचा तेथेच काढली पोलिसांनी धिंड
सातपूर (प्रतिनिधी): येथील श्रमिकनगर परिसरात शुक्रवारी (दि. २४) पहाटेच्या सुमारास परिसरातील वाहनांच्या काचा फोडत दहशत पसरवणाºया संशयितांच्या मुसक्या आवळण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे. २४ तासाच्या आत दोघा संशयितांना बेड्या ठोकत ज्या परिसरात वाहनांच्या काचा फोडल्या त्याच परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली.
श्रमिकनगर येथील कडेपठार व स्वामी समर्थ केंद्र परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी चारचाकी वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सातपूर पोलिसांनी तपास चक्रे गतिमान केली. गुन्हे शोध पथकातील सागर गुंजाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे शिवाजीनगर परिसरात राहणा-या दोघा संशयिताना ताब्यात घेतले असून एक संशयित फरार झाला आहे. साहिल डोंगरे (रा. धृवनगर, वय १८) व गणेश बोहरा (वय २२, रा. शिवाजीनगर) अशी ताब्यात ताब्यात घेतलेल्यांची नावे असून राहील शेख (रा. गंगापूर) हा तडीपार आरोपी फरार आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी काचा फोडल्या त्या परिसरात पोलिसांनी त्यांची धिंड काढली. वरिष्ठ निरीक्षक सोहम माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल नळकंडे व रोहित गांगुर्डे, विलास गिते, सागर गुंजाळ, दीपक खरपडे, भूषण शेजवळ आदींनी कामगिरी केली.