नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याने मतदानाला विलंब झाला. त्यामुळे मतदारांना ताटकळत थांबावे लागून काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. प्रत्येक मतदान केंद्रावर अतिरिक्त मतदान यंत्रे देण्यात आल्याने काही वेळातच ही मतदान यंत्रे बदलण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दिवसभरात नाशिकमध्ये ३४, तर दिंडोरीत १९ मतदान यंत्रे बदलली गेली.
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २०) सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली. या मतदान प्रक्रियेकरिता गेल्या काही महिन्यांपासूनच मतदान यंत्रांची तपासणी करण्यात येऊन त्यांचे प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप करण्यात आले होते. ऐनवेळी निर्माण होणारी तांत्रिक अडचण विचारात घेता अतिरिक्त मतदान यंत्रांचेही वाटप करण्यात आले. दिंडोरीसाठी २३०५ बॅलेट युनिट्स, २३०५ कंट्रोल युनिट्स आणि २४९६ व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. नाशिकसाठी २२९० कंट्रोल युनिट्स, २२९० बॅलेट युनिट्स व २४८० व्हीव्हीपॅट मशीनचे वाटप करण्यात आले. जिल्हास्तरावर ५९८० बॅलेट युनिट्स, ९६६ कंट्रोल युनिट्स आणि ७९९ व्हीव्हीपॅट युनिट्स राखीव ठेवण्यात आले होते.
नाशिक मतदारसंघात सकाळी ५.३० वाजता उमेदवारांसमक्ष मॉकपोल घेण्यात आले. यादरम्यान नाशिकमध्ये १२ कंट्रोल युनिट्स, २८ बॅलेट युनिट्स व ३० व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने लागलीच ते बदलण्यात आले. तर मतदान प्रक्रियेदरम्यान सहा बॅलेट युनिट्स, तीन कंट्रोल युनिट्स व ३० व्हीव्हीपॅट मशीन्स बदलण्यात आले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मॉकपोल दरम्यान १५ बॅलेट युनिट्स, १५ कंट्रोल युनिट्स व नऊ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. दिवसभरात मतदानादरम्यान दिंडोरीमध्ये चार बॅलेट युनिट्स, २ कंट्रोल युनिट्स व १२ व्हीव्हीपॅट मशीन्स बदलण्यात आले. ग्रामीण भागात उन्हाचा पारा चाळिशीपार गेल्याने तापमानामुळेही मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाला होता.