नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीत नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांत किरकोळ वाद वगळता लोकशाहीचा मतोत्सव शांततेत पार पडला. शहरासह ग्रामीण भागात तळपत्या उन्हात मतदानासाठी मतदारांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला. रात्री ११ वाजता प्राप्त माहितीनुसार, नाशिकमध्ये ६१ व दिंडोरीत ६२.६६ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. उशिरापावेतो मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळे अंतिम टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिकमधील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी ईव्हीएमला हार घातल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशकात आ. देवयानी फरांदे व माजी आ. वसंत गिते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. गोंधळ घातल्याप्रकरणी माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पिण्याच्या पाण्यासह मूलभूत प्रश्न सुटले नसल्याच्या निषेधार्थ दिंडोरी मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील ‘मेहुणे’ गावात जवळपास तीन हजार ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
दुपारचे ऊन टाळण्यासाठी सकाळी ७ पासूनच मतदारांनी केंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान अनेक मतदान केंद्रंवर मतदान यंत्र्े बंद पडल्याचे दिसून आले. नाशिक मतदारसंघात सकाळी ५.३० वाजता उमेदवारांसमक्ष मॉकपोल घेण्यात आला. या दरम्यान नाशिकमध्ये १२ कंट्रोल युनिट्स, २८ बॅलेट युनिट्स व ३० व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने लागलीच ते बदलण्यात आले. तर मतदान प्रक्रियेदरम्यान सहा बॅलेट युनिट्स, ३ कंट्रोल युनिट्स व ३० व्हीव्हीपॅट मशीन्स बदलण्यात आले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मॉकपोलदरम्यान १५ बॅलेट युनिट्स, १५ कंट्रोल युनिट्स व नऊ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. दिवसभरात मतदाना दरम्यान दिंडोरीमध्ये चाार बॅलेट युनिट्स, दोन कंट्रोल युनिट्स व १२ व्हीव्हीपॅट मशीन्स बदलण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रांवर पाणी, विजेची व्यवस्था, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, महिला आणि पुरुष मतदारांच्या वेगळ्या रांगा, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतक-यांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला. एका शेतकºयाने तर ईव्हीएममध्ये मतदान करताना चक्क टोमॅटोचा वापर केला. तसेच, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मोबाइल बंदी असताना एकाने मोबाइलमध्ये, मतदान करतानाचे शूटिंग केले. त्याचे मतदान करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टोमॅटोच्या साह्याने बटन दाबून मतदान करतानाचा हा व्हिडिओ आहे. त्र्यंबक तालुक्यातील झरवडजवळील जोशी कंपनी या आदिवासी वाडीपासून मतदान केंद्रावर जाण्यासाठी तीन किलोमीटर अंतर पायी चालावे लागणार असल्याने उन्हाचा तडाखा पाहता वस्तीतील ग्रामस्थांनी मतदान केंद्रापर्यंत जाण्यास नकार दिला. दुपारी ३ वाजेपर्यंत हे मतदार घरीच बसून होते.