नाशिक (प्रतिनिधी): नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२०) मतदान होत असून, या मतदानासाठी केंद्रांवर पोहोचण्यासाठी ५७० बसेस व १२५२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार (दि.१९) प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मतदानासाठीच्या साहित्याचे वितरण करण्यात आल्यानंतर बसेस, जीप मतदान केंद्रांकडे रवाना झाल्या. या मतदान प्रक्रियेसाठी १७ हजार कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून, सात हजार मतदान यंत्रांचे वाटप करण्यात आले.
मतदान साहित्य वाटप करताना प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी व स्वीकृतीसाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली होती. सुरुवातीला नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मच-यांची हजेरी घेण्यात आली. मतदान केंद्रांचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबधित मतदान अधिका-यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याची नोंद साहित्य वाटप नोंदवहीत घेण्यात आली. मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य, तसेच मतदान प्रक्रियेविषयीची विविध पाकिटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपुर्द करण्यात आले. साहित्य घेऊन जाण-या प्रत्येक वाहनाला बंदोबस्त देण्यात आला आहे.