नाशिक (प्रतिनिधी) : शिक्षक मतदारसंघासाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. ज्या शिक्षकांनी अजूनही नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनी १२ मेपर्यंत नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी १० जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. नाशिक विभागातील अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये अंतिम मतदार यादीनुसार एकूण ६४ हजार ८०८ शिक्षक मतदार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ८ मे २०२४ पर्यंत आणखी ९३१ शिक्षक मतदारांनी यादीत नाव यावे याकरिता नोंदणी अर्ज भरून दिले आहेत. ज्या शिक्षक मतदारांनी अजूनही नाव नोंदणीसाठी अर्ज क्र.१९ भरून दिला नसेल त्यांनी तो १२ मे पुर्वी भरून द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.