नाशिक (प्रतिनिधी): आयपीएलच्या हैदराबाद विरुद्ध मुंबई या क्रिकेट सामन्यावर उघड्यावर बसून बेटिंग लावणा-या एकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई मखमलाबाद रोडवरील क्रांतिनगर भागात करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून मोबाइल, रोकड आणि जुगाराचे साहित्य असा सुमारे पाच हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय दिनेश नागोड (वय २८, रा. लोणारी चाळ, मारुती मंदिराजवळ, क्रांतिनगर) असे संशयिताचे नाव आहे. अंमलदार नितीनकुमार पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मखमलाबाद रोडवरील क्रांतिनगर बस थांबा भागातील बंद गाळ्यांच्या बाहेरील मोकळ्या जागी बसून एक तरुण सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या हैदराबाद विरुद्ध मुंबई या क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.६) रात्री पोलिसांनी धाव घेतली असता संशयित उघड्यावर बसून मोबाइलच्या माध्यमातून सामन्याचे थेट प्रेक्षपण बघत बेटिंग लावताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून मोबाइल, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ५ हजार ८५० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार गुंबाडे करीत आहेत.