नाशिक, दिंडोरीतील उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस!
नाशिक (प्रतिनिधी): लोकसभेसाठीच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघात शनिवारी (दि. ४) झालेल्या अर्ज छाननीनंतर एकूण ५१ उमेदवार निवडणूक लढवण्यास पात्र ठरले आहेत. त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात ३६, तर दिंडोरीत एकूण १५ उमेदवार आखाड्यात आहेत. दोन्ही मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षांसमोर बंडखोरांचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांना शांत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, सोमवारी (दि. ६) दुपारी ३ पर्यंत माघारीची मुदत आहे. यात किती बंडखोर उमेदवार माघार घेतात, यावरून निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होईल.
नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया शनिवारी पार पडली. नाशिक मतदारसंघात ३९ पैकी तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट अर्थात महाविकास आघाडीसमोर माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या बंडखोरीचे आव्हान आहे. शिवसेना शिंदे गट अर्थात महायुतीसमोर शांतीगिरी महाराज आणि सिद्धेश्वरानंद गुरूस्वामी सोमेश्वरानंद सरस्वती या महंतांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार आहे. तशीच स्थिती दिंडोरी मतदारसंघात आहे. या मतदारसंघात २० पैकी १५ उमेदवारांचे अर्ज वैध, तर पाच जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे दिंडोरीत आता १५ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी महायुती आघाडीला आव्हान ठरणार आहे.
दोन्ही मतदारसंघांतील बंडखोरी रोखण्याकडे प्रमुख राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. माघारीसाठी सोमवारी दुपारी तीनपर्यंतची मुदत आहे. बंडखोरांची समजूत काढून त्यांना माघारीसाठी तयार करण्याचे शर्थीचे प्रयत्न सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. सोमवारी माघारीच्या मुदतीनंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. सोमवारी (दि.६) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी मिळणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक आयोगाने विहित नमुन्यातील अर्ज दिला असून, हा अर्ज भरून स्वत: उमेदवारालाच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उपस्थित रहावे लागेल. अन्यथा, अनुमोदकाला प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केल्याचे पत्र व त्या पत्रावर स्वाक्षरीचा नमुना देणे बंधनकारक आहे. आँनलाईन किंवा अनुमोदकाला परस्पर उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे किती उमेदवार रिंगण सोडतात, याकडे उमेदवारांचे लक्ष लागून आहे.