१०० कोटी रुपयांची ‘माया’ जमविल्याचा आरोप; मुख्य संशयित विनोद खुटे हा दुबईत फरार?
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह पुणे, कोल्हापूर येथेही छापे टाकण्यात आले. विनोद तुकाराम खुटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याबाबत पुण्यात गुन्हा दाखल आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून नाशिकसह पुणे, कोल्हापूर या शहरांत कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकण्यात येवून मालमत्ता जप्त करण्यात आली.
पॉन्झी नावाच्या योजनेतून अव्वाच्या सव्वा दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)ने व्हीआयपीएस ग्रुपच्या कार्यालयावर छापा टाकत कंपनीची मालमत्ता जप्त केली. छाप्यात ईडीच्या पथकाने रोख स्वरूपातील रक्कम, बँकांच्या खात्यांमधील फंड, एफडी, ५ कोटी रुपये किमतीचे दागिन्यांसह मालमत्ता गोठविली आहे. काही आक्षेपार्ह कागदपत्रे व डिजीटल साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
विनोद खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडाधे आदींविरोधात पॉन्झी मल्टी मार्केटिंग योजना आणि फॉरेक्सच्या नावाखाली फसवणूक केल्याचा पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याने विविध नावाने एकापेक्षा अधिक कंपन्या स्थापन करून नागरिकांना गंडा घातला होता. सक्तवसुली संचलनालयाकडून तपास केला जात आहे. या सर्व संशयितांनी सुमारे १०० कोटी रुपयांची ‘माया’ जमविल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्य संशयित विनोद खुटे हा फरार आहे.
विनोद खुटे याने दुबईत आश्रय घेतल्याचे बोलले जाते. सक्तवसुली संचलनालयाच्या मुंबई कार्यालयाकडून शोधमोहीम राबवून नाशिकसह पुणे, कोल्हापूर शहरात खुटे व त्याच्या परिवारातील सदस्यांची मालमत्ता असलेल्या ठिकाणी छापेमारी करून जप्तीची कारवाई करण्यात आली.
.कारवाईमध्ये सुमारे ७० कोटी ८६ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली गेली आहे.