नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २० जणांचे २९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १५ उमेदवारांचे अर्ज वैध तर पाच अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवनात शनिवारी (दि.४) दिंडोरी मतदार संघातील अर्जांची छाननी झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक बिनिता पेगु, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे तसेच उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
माजी आमदार चव्हाण यांचा अर्ज अवैधदिंडोरी लोकसभा मतदार संघात बंडखोरी केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संजय चव्हाण यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. राखीव लोकसभा मतदारसंघासाठी जातीचा दाखला उमेदवारांनी अर्जासोबत सादर करणे आवश्यक होते. तथापि, जातीचे प्रमाणपत्र नामनिर्देशन अर्जासोबत जोडलेले नसल्याने त्यांचा नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नामनिर्देशनपत्र अवैध ठरल्याची कारणे खान गाजी इकबाल अह मुबीन खान यांचे मतदार यादीतील नाव व जातीच्या दाखल्यावरील नावात विसंगती. जातीचा दाखला अर्जदार यांचाच आहे हे अर्जदार संधी देऊनही सिद्ध करू शकले नाही. त्यांनी एमआयएम पक्षातर्फे दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रासोबत १० सूचक दिलेले नसल्याने त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले. काशिनाथ वटाणे यांनी नामनिर्देशनपत्र एमआयएम पक्षाकडून अर्ज दाखल केला. मात्र, सोबत दहा सूचक नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. पल्लवी भगरे व सुभाष चौधरी यांच्या पक्षाने एबी फॉर्ममध्ये मुख्य उमेदवाराला प्राधान्य दिलेले आहे. पर्यायी उमेदवार म्हणून भगरे व चौधरी यांच्या अर्जासोबत केवळ एकच सूचक असल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे