नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात तापमानाचा पारा रविवारी (दि. २८) ४१ अंश सेल्सिअस पार गेल्यामुळे यंदाच्या मोसमातील रविवार हा हॉट दिवस ठरला. त्यामुळे तापमानाचा पारा असाच चढता राहतो की काय, अशी धास्ती नाशिककरांना वाटत होती. मात्र, दुस-याच दिवशी सोमवारी (दि. २९) कमाल तापमानात १.८ अंश सेल्सिअसने घट होऊन ते ३९.४ अंश सेल्सिअसवर आल्याने नाशिककरांना हायसे वाटले. एकीकडे कमाल तापमान काहीसे घसरले असले तरी किमान तापमानाने मात्र उच्चांक गाठला. सोमवारी किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे वातावरणातील उष्मा कायम असून, शहरवासीय हैराण झाले आहेत.
उकाड्याशी सामना कायम!मंगळवार (दि. ३०) पासून नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात विजा, वारा, गारा व अवकाळी पाऊस असे वातावरण निवळण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. मंगळवारपासून खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १० जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन, तर किमान तापमान सरासरीपेक्षा चार अंशांनी वाढून दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीच्या उकाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.