नाशिक : खुटवड नगर येथे एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला मोठी आग लागली. शनिवारी (दि.२७) सायंकाळी लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या ६ बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने जीवित हानी टळली.
खुटवड नगर येथील मुख्य रस्त्यावर देवआशा इलेक्ट्रॉनिक दुकानाला शनिवारी सायंकाळी अचानक लागली. या दुकानाचे मालक ओमप्रकाश सदिजा व तन्मय सुराणा यांनी या घटनेची माहिती अंबड पोलीस स्टेशन व अग्निशमन दलाला दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब पोहचले. सुरुवातीला सातपूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आग आटोक्यात येत नसल्याने सिडको आणि मुख्यालय येथून प्रत्येकी दोन दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. या आगीत दुकानातील टीव्ही, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिन व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागली त्यावेळी इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये एकूण पाच ते सात कर्मचारी उपस्थित होते. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. घटनास्थळी मात्र मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केली होती. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. तसेच लाठी मार देखील करावा लागला. या आगीमुळे संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तब्बल ३ ते ४ तास नागरिकांना अंधारात रहावे लागले.आगीचे कारण मात्र समज शकले नाही. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.