नाशिक (प्रतिनीधी) : लोकसभा निवडणूक लढविणा-या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अन्य नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणारी चिन्हे आयोगाने जाहीर केली आहेत. लॅपटॉप, माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राइव्ह, रोबोट, हेडफोन… ही डिजिटल साधनांची जंत्री नव्हे, तर निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नवीन निवडणूक चिन्हे आहेत. या मुक्त चिन्हांमध्ये आता डिजिटल साधनांचाही समावेश करण्यात आला आहे.
नाशिक व दिंडोरी लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीत दि. ३ मे रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करायची अंतिम मुदत आहे. यंदा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी करणा-यांसाठी आयोगाने १९० चिन्हाची यादी प्रसिद्ध केली आहेत. खरेतर लोकसभा निवडणूक असो की, विधानसभा निवडणूक यामध्ये निवडणूक चिन्हे ही महत्त्वाची भूमिका बजावतात. निवडणूक चिन्हापुढील बटण दाबूनच आपण कोणत्याही उमेदवाराला मतदान करतो. राष्ट्रीय पक्ष असोत वा छोटे पक्ष किंवा अपक्ष उमेदवार या सर्वांनाच निवडणूक चिन्ह दिले जाते. बॅलेट पेपरवरील चिन्ह पाहून मतदार त्याच उमेदवाराला मतदान करू शकतात, याची खून म्हणजेच निवडणूक चिन्ह. हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून दिले जाते. या चिन्हांमध्ये २०१९ पासून लॅपटॉप, माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राइव्ह, रोबोट, हेडफोन यांसारख्या ‘डिजिटल’ निवडणूक चिन्हांचाही वापर करण्यात आला आहे.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघात दि. ६ मे रोजी माघारीनंतर निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्याचदिवशी उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. निवडणुकीत आयोगाने घोषित केलेल्या यादीनुसार देश व राज्यस्तरावर ९ राजकीय पक्षांना मान्यता दिली असून त्यांचे निवडणूक चिन्हही अंतिम करण्यात आले. याशिवाय निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवारी करणाºयांसाठी आयोगाने १९० चिन्ह अंतिम केले आहेत. आयोगाने अपक्षांसाठी एकुण १९० चिन्हे अंकित केली आहेत. त्यामध्ये शिट्टी, तंबु, कलिंगड, दुरध्वनी, टी. व्ही. रिमोट, त्रिकोण, मोजे, सोफा, कात्री, सेफ्टी पिन, प्रेशर कुकर, शिवण यंत्र, पेनड्राईव्ह, रोड रोलर, टुथपेस्ट, संगणक माऊस, आॅटोरिक्षा, पाव, कॅमेरा, कॅरम बोर्ड अशा निरनिराळ्या चिन्हांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीत अपक्षांना कोणते चिन्ह मिळणार यावरुन मतदारांमध्ये आता उत्सुकता लागून राहिली आहे.
या पक्षांना मान्यता : केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता मिळालेले राष्ट्रीय व राज्यस्तरीय ९ पक्ष आहेत. आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, मनसे, शिवसेना दोन्ही गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा यात समावेश आहे.
निवडणूक चिन्हांचे प्रकार किती?
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही पक्षाला दोन प्रकारची निवडणूक चिन्हे दिली जातात. यातील पहिले आरक्षित निवडणूक चिन्ह असते आणि दुसरे स्वतंत्र निवडणूक चिन्ह. राखीव निवडणूक चिन्ह म्हणजे ते फक्त एकाच पक्षाला दिले जाते. तर, स्वतंत्र निवडणूक लढविणाºया उमेदवाराला जो कोणत्याही पक्षाचा नाही त्याला किंवा नवीन पक्ष, ठराविक मतदारसंघातील उमेदवार याला दिले जाते.