नाशिक (प्रतिनीधी) : लोकसभेच्या नाशिक, दिंडोरी मतदार संघासाठी उमेदवार अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचे नाशिक आणि दिंडोरी मतदार संघातील उमेदवार सोमवारी (दि.२९) अर्ज भरणार आहेत. तसेच स्वामी शांतीगिरी महाराज देखील अर्ज दाखल करणार आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ३ मे रोजी अर्ज भरणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास कागदोपत्री आठ दिवसांचा कालावधी असला तरी यातील तीन दिवस सार्वजनिक सुट्टी आहे. हे दिवस वगळता इच्छुकांना प्रत्यक्षात पाच दिवस अर्ज भरण्यास मिळणार आहेत. यातील पहिल्या दिवशी बहुतेकांनी अर्ज खरेदी करण्यास प्राधान्य दिले. या दिवशी दिंडोरीत दोघांनी तर, नाशिकमध्ये एकाने अर्ज दाखल केला. सोमवारी महाविकास आघाडीचे उमेदवार खा. संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करणार असले तरी नाशिक मतदार संघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. त्यामुळे दिंडोरीच्या उमेदवाराला देखील अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.