नाशिक (प्रतिनिधी) : आज पुन्हा शहराचे तापमान चाळिशीपार गेलेले तापमान या आठवड्यात सोमवारी (दि. २२) घसरून ते ३५.९ अंश सेल्सिअसवर घसरल्याने शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला, असे वाटत असतानाच शनिवारी (दि. २७) तापमानाने पुन्हा चाळिशी पार केली असून, कमाल तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
आठवड्याच्या सुरुवातीला तापमानाचा पारा खाली आला असला तरी आठवडा संपण्याच्या अखेरच्या दिवशी कमाल व किमान तापमानात वाढ झाल्याने वातावरणातील उष्मा कायम आहे. मागील आठवड्यात नाशिकचे कमाल तापमान सलग तीन दिवस ४०.७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले गेले. किमान तापमानही २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जात आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा अन् असह्य उकाड्याचा सामना सध्या नाशिककर करत आहेत. शनिवारी किमान तापमान २३.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल व किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे वातावरणातील उष्मा वाढल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवरची वर्दळही कमी झाल्याचे दिसून आले.