पिंपळगाव बसवंत (प्रतिनिधी) : निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथील विवाहिता वृषाली भागीरथ जाधव (वय ३१) हिने विहिरीत उडी मारून शनिवारी (दि. २७) आत्महत्या केली. याप्रकरणी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सासरच्या सहा संशयितांविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी वृषाली जाधव यांचे वडील दत्तात्रय पुंडलिक वाघ (वय ६०, रा. काथरगाव, ता. निफाड) यांनी शनिवारी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वृषाली हिचा तिच्या सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात येत होता. लग्नात मानपान दिला नाही, यासह मुलगा होत नाही, घरात व्यवस्थित काम करीत नाही आदी वेगवेगळ्या कारणांवरून सासरच्यांनी तिला वेळोवेळी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, वृषालीची सासू साजराबाई भाऊसाहेब जाधव, सासरे भाऊसाहेब दगडू जाधव, पती भागीरथ भाऊसाहेब जाधव, भाया संजय भाऊसाहेब जाधव, जाऊ राधा संजय जाधव, दीर शरद भाऊसाहेब जाधव, (सर्व रा. वावी ठुशी, ता. निफाड) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर वृषाली जाधववर काथरगाव येथे अंत्यविधी करण्यात आला. पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहे.