मद्य, अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी चेकपोस्ट्सवर २४ तास बंदोबस्त!
नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिक्षेत्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक ग्रामीण व जळगाव जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात व मध्यप्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातील चेकपोस्ट्स सक्रिय करण्यात आले असून, या ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू आहे. चेकपोस्ट्सवरील कर्मचा-यांनी मद्यासह, गुटखा आणि अमली पदार्थाची तस्करी रोखत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी नाशिक ग्रामीणसह धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सीमावर्ती भागातील चेकपोस्ट्सवर २४ तास पोलीस बंदोबस्त आहे. त्यानुसार गुजरात सीमेवर अवैध मद्य तस्करीप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी १२, धुळे पोलिसांनी दोन व नंदुरबार पोलिसांनी १० गुन्हे दाखल करीत, ४० लाख ६९ हजार ४६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तर गुटखा तस्करीप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आठ व नंदुरबार पोलिसांनी सहा गुन्हे दाखल करीत एक कोटी १३ लाख सात हजार ८९८ रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर अवैध मद्य तस्करीप्रकरणी जळगाव व धुळे पोलिसांनी प्रत्येकी दोन आणि नंदुरबार पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करीत, ६६ लाख सात हजार ६८ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला, तर गुटखा तस्करीप्रकरणी पाच गुन्हे दाखल करीत ३७ लाख ४३ हजार ५९६ रुपयांचा गुटखा जप्त केला. तसेच, अमली पदार्थप्रकरणी तीन गुन्हे दाखल करीत ४५ लाख ९९ हजार १०० रुपयांचा अमली पदार्थांचासाठा जप्त केला आहे.