चार जागांचा पर्याय फेटाळला
जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याच्या बदल्यात माकपसाठी विधानसभा निवडणुकीत चार जागा सोडण्याचा पर्याय गावित यांच्यासमोर ठेवला. मात्र त्याचाही फारसा परिणाम गावित यांच्यावर होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी तो फेटाळून लावत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे मत व्यक्त केले.
नाशिक (प्रतिनिधी): महाविकास आघाडीसोबत असणा-या माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी बंडाचा पवित्रा घेत दिंडोरी लोकसभा निवडणुकीत माकपच्या वतीने उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दिंडोरी मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावित यांची भेट घेत समजूत काढण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. भारती पवार, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सुरुवातीला या मतदारसंघातून दोनच उमेदवारांची नावे असताना आता जे. पी. गावित यांनी देखील निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात शरद पवार यांच्या नाशिक दौ-यात गावित यांनी त्यांची भेट घेत दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यानंतर पवार यांनी भगरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने गावित नाराज झाले. माकपच्या मेळाव्यात उमेदवारीविषयी निर्णय झाल्याने तशी भूमिका गावित यांनी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा फटका आपल्याला बसू नये, याकरिता जयंत पाटील यांनी तातडीने नाशिक गाठत ओझरखेड येथे गावित यांची भेट घेतली व उमेदवारी न करण्याचे साकडे घातले. मात्र, गावित यांचे मन वळविण्यात पाटील यांना यश येऊ शकले नाही.
ओझरखेड येथे माझी व जयंत पाटील यांची बैठक झाली. त्यात त्यांनी लोकसभेच्या बदल्यात विधानसभेसाठी माकपला चार जागा देण्याचा पर्याय दिला. मात्र, तो पटला नाही. त्यामुळे मी निवडणूक लढविणार आहे. शरद पवार यांच्याबरोबर येत्या दोन दिवसांत चर्चा करून निरोप दिला जाईल, असे पाटील यांनी सांगितले आहे. मात्र आता वेळ निघून गेली आहे.
– जे. पी. गावित, माजी आमदार, माकप