युवा महोत्सवातून नाशिकचे होणार ब्रॅण्डिंगमुख्यमंत्री शिंदे ; सर्व सुविधा देणार
नाशिक । प्रतिनिधी
केंद्र सरकारने राष्ट्रिय महोत्सवासाठी नाशिकची निवड केली त्याबद्दल राज्य सरकार आभारी आहे. पंतप्रधान मोदींसह देशभरातील आठ हजार युवक या सोहळ्याला उपस्थित राहणार असून स्थानिक युवकांनाही त्यांच्या कलागुणांना प्लॅटफाॅर्म मिळेल. एक प्रकारे नाशिकची संस्कृती, परंपरा व पाहुणचाराचे जगभरात ब्रॅण्डिंग होणार असून ही एक मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रम तयारीचा सोमवारी (दि.८)आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तपोवन येथे मुख्य कार्यक्रम होणार असून हनुमान नगर, कवी कालिदास कला मंदिर, महात्मा फुले कलादालन या ठिकाणीही युवकांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम होतील. या ठिकाणी हजारो युवक येणार असून त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था केली जाईल. या सोहळ्यानिमित्त शहर स्वच्छतेसोबतच रस्ते सजावट, भिंतीवर देखावे साकारणे, महत्वाच्या वास्तू व पुलांवर आकर्षक रोषणाई यावर भर दिला जाणार आहे. तसेच रोड शो मार्ग फुलांनी आकर्षक पध्दतीने सजविण्यात येईल. या ठिकाणी येणारा प्रत्येक युवक नाशिकच्या पाहुणचाराच्या सुखद आठवणी सोबत घेईन जाईल अशी भव्य तयारी करण्याचे आदेश यंत्रणेला दिल्याचे त्यांनी सांगितले.