पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील भूमि अभिलेख विभागात जागा निघाल्या असून, तेथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. सामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्याने नोकरीच्या आमिषाला बाली पडला आणि ५ लाख ४० हजार रुपयात फसवणूक झाली. या प्रकरणी अमळनेर येथील अमीन पिंजारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, ट्रकचालक इकबाल पिंजारी यांनी फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली आहे. अमळनेर येथील तांबापुरा भागामध्ये राहणारा पत्नीचा मावस भाऊ अमीन पिंजारी याने घरी येऊन मुलास जिल्हा भूमिलेख विभागात नोकरी लावून देतो; असे आमीष दाखविले. यासाठी मार्च ते जून २०२१ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी करून ५ लाख ४० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. वेळोवेळी पैसे जमा केले. मात्र अडीच वर्षे झाले तरी नोकरी मिळाली नाही.
नोकरी मिळत नसल्याने पैसे परत देण्याबाबत अमीनकडे मागणी केली. पैशांची मागणी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसात तक्रार दिली करण्यात आली. त्या आधारे पोलिसांनी अमीन पिंजारीविरोधामध्ये फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक योगेश गणगे तपास करीत आहेत.