नाशिक : कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल असलेले बांधकाम व्यावसायिक संशयित नरेश कारडा यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. १०) ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. तसेच दर रविवारी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.
अधिक माहितीनुसार, नाशिकमधील एका व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून नरेश कारडा यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसांत १ काेटी, तर उपनगर पोलिसांत ४ कोटी रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये ३० ऑक्टोबरला संशयित कारडा यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर उपनगर पोलिसांत ५ नोव्हेंबरला जळगावातील एका व्यावसायिकाने कारडा यांच्याविरोधात चार कोटी रुपयांच्या अपहाराची फिर्याद दिली. तर बुधवारी (दि. ८) कारडा यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
कारडा मध्यवर्ती कारागृहात असताना त्यांच्यावर गुरुवारी (दि. ९) तिसरा गुन्हा उपनगर पोलिसांत दाखल करण्यात आला. त्यामध्ये नाशिक रोड परिसरामधील एका महिलेने फिर्याद दिली आहे. आर्टिलरी सेंटर परिसरात कारडा समूहाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी महिलेने एक फ्लॅट बुक केला होता. त्याचे ३ लाख रुपये कारडा यांना तीन टप्प्यांत दिले. परंतु त्यानंतर फ्लॅटचा ताबा मिळालाच नाही. तर बांधकाम एका फायनान्स कंपनीने लिलावात काढले आहे. त्यामुळे महिलेच्या पैशांचा अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि. १०) वकील राहुल कासलीवाल यांनी कारडा यांचा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला. त्यानुसार न्यायालयाने अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर केला आहे. मात्र, प्रत्येक रविवारी कारडा यांना पोलिसांत हजेरी लावत पुढील सर्व गुन्ह्यांत व तक्रारींच्या तपासात पोलिसांना सहकार्य करण्यासंदर्भात न्यायालयाने आदेशित केले आहे.