कल्याण : आंबिवली येथील इराणी वस्तीतील नागरिकांनी पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. ८) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. मध्यरात्री आरोपीला पकडण्यासाठी अंधेरी पोलिसांचे १ पथक खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इराणी वस्तीत दाखल झाले होते.
पोलिसांचे पथक दाखल होताच इराणी वस्तीतील महिला-पुरुषांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत १० पोलिस जखमी झाले आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींत महिला-पुरुषांचा समावेश आहे. या चोरट्यांमधील एकास ताब्यात घेतले आहे. तर दोघे फरार आहे. कल्याण पश्चिमेतील आंबिवली परिसरात इराणी वस्ती आहे. बुधवारी अंधेरी पोलिस ठाण्याचे काही पोलिस एका आरोपीच्या शोधात याठिकाणी आले होते. त्यांच्यासोबत खडकपाडा पोलिस ठाण्याचे काही पोलिस होते. आरोपीचा शोध घेत असताना इराणी वस्तीतील नागरिकांनी व चोरट्यांच्या नातेवाईकांनी दगडफेक सुरू केली.