नाशिक : ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये पराभव झाल्याने काझड (ता. इंदापूर) गावामध्ये दशहत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार करुन पळून जाताना पोलिसांच्या अंगावर गाडी घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी राहुल चांगदेव नरुटे व समीर मल्हारी नरूटे (रा. काझड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, रविवारी (दि. ५) ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या असून, सोमवारी (दि. ६) निकाल जाहीर झाले. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये राहुल नरुटे व समीर नरूटे दोघे उभे होते. दोघांचा पराभव झाल्यानंतर राहुलने पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली.
पोलिसांनी दोघांचा पाठलाग करताना चौकात दोघांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस हवालदार गणेश काटकर यांनी वालचंदनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणाचा तपास वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करत आहे.