सोलापूर : राज्यामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयामधील ललित पाटील ड्रग्स प्रकरण गाजत असतानाच नाशिकच्या ड्रग्स प्रकरणाचे आता सोलापूरमध्ये कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई, पुणे पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन कारवाई करत असताना नाशिक पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत मुंबई आणि सोलापूरमध्ये धडाकेबाज कारवाई केली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा ललित पाटील प्रकरणाशी अद्याप कुठलाही संबंध नाही. नाशिकरोड परिसरातील ड्रग्सच्या गुन्ह्याचा माग काढताना नाशिक पोलिसांनी सोलापुरमधील ड्रग्सचा कारखाना उध्वस्त केला असून सुमारे १० कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच नाशिकमध्ये सोलापूरमधून ड्रग्ज येत असल्याचं तपासात उघडकीस आले आहे. तर नाशिकच्या वडाळा गावातील ड्रग्ज रॅकेटचा तपास करताना मुंब्र्यातून दुसऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. शब्बीर असे या संशयिताचं नाव आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांनी सलमान नावाच्या ड्रग्स पेडलरला अटक केली होती. सलमान नाशिकपर्यंत ड्रग्स सप्लाय करायचा त्याला शब्बीर ड्रग्स पुरवठा करत असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. मुंबईतील रॅकेटची साखळी शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक आणि क्राईम ब्रँचच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.
ड्रग्ज प्रकरणी नाशिकमध्ये तीन वेगवेगळे गुन्हे
आतापर्यंत नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वात पहिला गुन्हा ललित पाटील ड्रग प्रकरणात दाखल करण्यात आला होता. यासंबंधित गोडाऊन नाशिक पोलिसांनी उध्वस्थ केले होते. याचा तपास स्वतंत्रपणे नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणातील गुन्हेगार मुंबई आणि पुण्यातील आरोपींशी संबंधित आहेत. पण शुक्रवारी (दि. २७) पोलिसांनी जी कारवाई केली आहे, ती एका ड्रग रॅकेटसंदर्भातील आहे. नाशिकमध्ये ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी आरोपींनी सोलापुरमध्ये कारखाना सुरू केला होता. गेल्या १० ते १२ दिवसांपूर्वी सोलापुरात आणखी एक कारखाना उध्वस्त केला होता. पोलिसांनी कारवाई केलेल्या कारखान्यात प्रयोगशाळा तयार करण्यात आली होती. त्यासोबतच ड्रग्जचा साठा, कच्चा मालही सापडला आहे.
नाशिकच्या वडाळागाव परिसरामध्ये छोटी भाभीचं ड्रग रॅकेट होतं. तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी आधीच अटक केली होती. आतापर्यंत चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नाशिक पोलिसांनी सलमान नावाच्या ड्रग्स पेडलरला अटक केली होती. सलमान नाशिकपर्यंत ड्रग्स सप्लाय करायचा त्याला शब्बीर ड्रग्स पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, नाशिक पोलिसांची ड्रग्स प्रकरणातील कारवाई सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू आहे.