लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दोघा लाचखोर महिलांसह एकाला अटक
नाशिक : पिंपळगाव नजिक असलेल्या शेतीची बिनशेती म्हणजेच एनए करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली गेली. त्यातील ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना निफाडच्या नायब तहसीलदार व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. कल्पना शशिकांत निकुंभ (वय ५७) व कोतवाल अमोल राधाकृष्ण कटारे (वय ३८) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. दरम्यान, नायब तहसीलदार निकुंभ यांना सेवानिवृत्तीसाठी अवघे पाच महिने राहिले होते. मात्र, अशा प्रकारांमुळे त्यांच्या कर्तव्याला डाग लागले आहेत.
तक्रारदारांच्या तक्रारीनुसार, त्यांचे चुलत आजोबा व इतरांचे मौजे पिंपळगाव नजिक गटापैकी ८३०० चौरस मीटर क्षेत्र बिनशेती करायचे होते. त्यासाठी त्यांनी निफाड तहसीलमध्ये विनंती अर्ज दिला होता. या प्रकरणात कार्यालयीन टिप्पणीवर सही करून ते तहसीलदारांकडे सादर करण्यासाठी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले.
दरम्यान, याप्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, पथकाने सापळा रचला असता, लाचखोर नायब तहसीलदार निकुंभ यांच्या सांगण्यावरून संशयित कोतवाल अमोल कटारे याने प्रशासकीय इमारतीच्या पुरुष प्रसाधनगृहात लाचेची ३५ हजारांची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्याचे आढळून आले. त्यानुसार दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बागूल, गायत्री जाधव, अजय गरुड, किरण अहिरराव,संतोष गांगुर्डे यांनी केली.
तसेच नगर जिल्ह्यातही पाथर्डी तालुक्यात राज्य कर अधिकारी वर्ग २, वस्तू व सेवा कर विभागच्या सारिका जयवंत निकम (वय ३९) यांना चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या घातल्या. जीएसटी नंबर रिटर्न फाईल न केल्यामुळे जुलै २०२२ मध्ये रद्द करण्यात आला होता. तो पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तक्रारदारांकडून संबंधित महिला अधिकाऱ्याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार तक्रारदाराने चार हजार रुपये देण्याचे ठरवले. मात्र, लाचलुचपतकडे त्यांनी तक्रार दिली. ही रक्कम स्विकारताना संबंधित महिलेला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद गोर्डे, पोलीस उपाधीक्षक हरिष खेडकर, पोलीस नाईक चौधरी, सचिन सुद्रुक, राधा खेमनार, संध्या म्हस्के आदींच्या पथकाने केली.