नाशिक : नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकास 500 रुपयांची लाच घेताना अटक झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अर्जदाराने केलेल्या तक्रारीनुसार त्यांना चारचाकी वाहनाचे प्रादेशिक परिवहन विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र गहाळ झाल्याची नोंद पोलीस दप्तरी करावयाची होती. मात्र, यासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मधुकर दत्तू पालवी (वय ४२, रा. पोलीस वसाहत, पोलीस मुख्यालयाजवळ, नाशिक) यांनी ५०० रुपयांची मागणी केली. ही लाच स्विकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलीस नाईक प्रकाश महाजन आदींनी ही कारवाई केली.