रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री प्रकरणी पुरवठा विभागाने दिली फिर्याद
नाशिक – इगतपुरी तालुक्यातील गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असतांना उपसरपंच आणि ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार अनिता गोपाळा लहांगे, बाळासाहेब रामभाऊ मते या संशयित आरोपींवर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
![धक्कादायक : माजी सभापती पत्नीवर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 2 IMG 20220901 WA0018](https://i0.wp.com/nashikfast.com/wp-content/uploads/2022/09/IMG-20220901-WA0018.jpg?resize=368%2C275&ssl=1)
इगतपुरीचे तालुका पुरवठा निरीक्षक भरत भावसार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी अनिता गोपाळा लहांगे ह्या इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळा लहांगे यांच्या सौभाग्यवती असून दुसरा संशयित आरोपी बाळासाहेब मते हा राष्ट्रवादी काँग्रेसंचा पदाधिकारी असल्याचे समजाते. यामुळे इगतपुरी तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु केला आहे. इगतपरी तालुका पुरवठा निरीक्षक भरत श्रावण भावसार, वय 54 वर्षे, धंदा नोकरी, चेतनानगर, नाशिक यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, 30 ऑगस्टला सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास गडगडसांगवी ता.
येथील उपसरपंच रतन शिंदे यांनी फोनवरून गावातील रेशन दुकानदार बाळासाहेब रामभाऊ मते हा त्याचे गाडीत स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ व गहु काळया बाजारात विक्रीसाठी घेवून जात असतांना त्याला आम्ही गाडीसह पकडले आहे, तुम्ही लवकर या, असे कळविले. त्यानुसार गडगडसांगवी येथे जावुन खात्री केली असता, चौफुलीवर लोकांची गर्दी जमलेली होती टाटा कंपनीचा छोटा हत्ती क्र. एमएच 05 डीआर 2536 हा तेथेच उभा होता. उपसरपंच रतन शिंदे यांनी सांगितले की, मी तसेच खंडु काळु बेंडकोळी, दत्तु रघुनाथ पाडेकर, दिलीप पुंजा शिंदे असे सकाळी 9 वाजेचे सुमारास रस्त्यावर उभे होतो. रेशन दुकानदार बाळासाहेब रामभाऊ मते हा त्याचे गाडीत स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ व गहु काळया बाजारात विक्रीसाठी घेवून जात असतांना हात देवून उभा केला. त्यांची गाडी तपासली असता सरकारी धान्य मिळुन आल्याने आम्ही धान्य जागेवरच खाली उतारुन ठेवुन तुम्हाला फोन केला, असे सांगितले. त्यानंतर स्वतः धान्याची पाहणी करुन खात्री केली असता सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातील अंत्योदय योजना व प्राधान्य योजने अंतर्गत आलेले शिधा वाटपासाठी आलेले रेशन धारकांसाठी राखीव असलेले धान्य होते. त्यात 50 किलो प्रमाणे 1 कट्टा असे एकुण 32 कट्टे तांदुळ व 50 किली प्रमाणे 1 कट्टा गहु असे एकुण 33 कट्टे असा एकुण बाजार भावाप्रमाणे तांदळाचा एक कट्टा रुपये 1500 प्रमाणे, 32 कट्टयांची एकुण किंमत 48 हजार तसेच एक कट्टा गहु रुपये 1 हजर असा एकुण 49 हजार रुपये किमतीचा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष सविस्तर पंचनामा केला. त्यानंतर पुन्हा 33 कट्टे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान क्र. 111 मध्ये पंचासमक्ष सिल करून ठेवण्यात आले आहे.
हे धान्य स्वस्त धान्य दुकानदार अनिता गोपाळा लहांगे, बाळासाहेब रामभाऊ मते हे संशयित आरोपी स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री साठी घेऊन जात असल्याचे दिसून आल्याने फिर्याद देण्यात आली आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3, 7 आणि भारतीय दंडविधान संहिता 1865 चे कलम 34 नुसार अनिता गोपाळा लहांगे, बाळासाहेब रामभाऊ मते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी तपास सुरु केला आहे.