नाशिक: डाॅ नरेंद्र दाभोलकर ( dr narendra dabholkar ) स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच औरंगाबाद येथे दि.३जून ते ५ जून या कालावधीत उत्साहात पार पडली. संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी अविनाश पाटील, ( avinash patil ) राज्य कार्याध्यक्षपदी माधव बावगे ( madhav bavge ) यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे ( uttam kamble ) यांची फेरनिवड झाली.नाशिक येथील डाॅ. ठकसेन गोराणे (thaksen gorane ) यांची प्रधान सचिव पदी सहमतीने निवड करण्यात आली . या अगोदर डॉ. गोराणे हे संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी मागील बारा वर्षांपासून कार्यरत होते.
यावेळी नाशिक येथील प्रा. डॉ. सुदेश घोडेराव ( sudesh ghoderao ) यांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समन्वयक तर कृष्णा चांदगुडे ( krushna chandgude ) यांची जातपंचायतींना मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह म्हणून फेरनिवड करण्यात आली. संघटनेच्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे सह व्यवस्थापक म्हणून नाशिक रोड येथील राजेंद्र फेगडे ( rajedra fegde ) यांना संधी देण्यात आली.
कृष्णा चांदगुडे लिखित ‘जातपंचायतींना मूठमाती’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीसह, संघटनेच्या अन्य तीन कार्यकर्त्यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन शिक्षक आमदार विक्रम काळे व ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. जयदेव डोळे ( dr jaydev dole ) यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील तीन वर्षांसाठी राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची सर्व सहमतीने घोषणा करण्यात आली. संघटनेच्या अन्य कामकाजासह, पुढील तीन वर्षांच्या कामांचे नियोजन करण्यात आले.
बैठकीच्या समारोप सत्रात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कानगो ( bhalchandra kango ) यांच्या हस्ते, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या लक्षवेधी कामाचे कौतुक म्हणून, त्यांचा सन्मानचिन्ह, पुस्तक, व गुलाबपुष्प देऊन, यथोचित गौरव करण्यात आला . याच वेळी डाॅ. कानगो यांच्या हस्ते नवीन राज्य कार्यकारणीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.