नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात लाकडाच्या तस्करीबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांवर ग्रामस्थांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
अधिक माहिती अशी की, सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील उंबरपाडा (चाफावाडी) फणसाचे माळ शिवारात रात्रीच्या वेळी साडेसातच्या सुमारास खैराच्या लाकडाची तस्करी होणार असल्याची गुप्त वार्ता वनविभागाला मिळाली होती.
या गुप्त बातमीच्या आधारे वन कर्मचारी यांनी सापळा रचला होता. यामध्ये फिर्यादी रामजी कुवर वनरक्षक यांनी म्हटले आहे की, ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. १५,पी.एस.७२८६ यामध्ये खैराचे लाकूड भरून लालजी टोपले हा घेऊन चालला होता.
त्यास विचारुन अटकाव केला असता त्यांनी ग्रामस्थांना बोलावून कामात अडथळा निर्माण केला. यामध्ये कमलाकर चव्हाण, सावळाराम गावित, ज्ञानेश्वर गावित यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करुन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये कुवर यांची दुचाकी क्रमांक एम. एच. १५,एफ.जे.२८१६ हि दंडुक्याने ठेचून नुकसान केले. तसेच घोळका करून हल्ला केल्याचे म्हटले आहे. तसेच ज्ञानेश्वर गावित याने पोटावर, हातापायांवर दगडाने मारुन गंभीर जखमी केले.कुवर यास काहीजण पकडून गावात घेऊन गेले. तेथे मला बांधून ठेवून एक ते दीड तास ओलीस ठेवत जबर मारहाण केली.
परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली असली तरीदेखील खैर लाकडाच्या तस्करीचे धागेदोरे सोनगीर ते गुजरात राज्यातील तस्कराशी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. हा तस्कर नेमका कोण आहे हे शोधून काढणे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.
दोन्ही बाजूंनी परस्परविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे, सहारे, एस. आय. बर्डे, इ. जी. भालेराव, ढुमसे हे सुरगाणा पोलिस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.