नाशिकः दिल्ली पोलिसांनी नाशिकमध्ये पुन्हा एक कारवाई करत पिस्तुल आणि काडतूस विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.टेकचंद दालचंद खेरी (वय 30) आणि द्याचंद जयपाल डिलर (वय 25) हे दोन तरुण दिल्लीत पिस्तूल आणि काडतुसांची विक्री करायचे. मात्र, ते पोलिसांच्या रडारवर आले होते. हे पाहता त्यांनी दिल्लीतून धूम ठोकली आणि लपण्यासाठी थेट नाशिक गाठले. मात्र, इथेही त्यांच्या मागे पोलीस टपकले आणि त्यांना अलगद उचलले.
फरीदाबादचा टेकचंद दालचंद खेरी आणि हरियाणाचा द्याचंद जयपाल डिलर यांचा दिल्लीत पिस्तुल आणि काडतूस विक्रीचा धंदा. त्यांनी चांगलाच जम बसवला होता. काही काळ सुरळीत चालले. मात्र, त्यांच्यावर पोलिसांची नजर पडलीच. हा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांनी थेट नाशिक गाठले. येथे मित्राच्या मदतीने ते रहात होते, पण शस्त्र विकणारे संशयित नाशिकला लपून बसल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्यांनी नाशिक येथे येऊन या संशयितांना अटक केली