नाशिक : काही दिवसांपूर्वी जामिनावरुन तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून केल्याची घटना नाशिकमधील पंचवटी परिसरात घडली आहे. प्रवीण काकड असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रवीण हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
पंचवटी परिसरात म्हसरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव लिंक रोड वरील रोहिणी हॉटेलच्या जवळ आज तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. प्रवीण काकड हा तरुण मित्रांसोबत रोहिणी हॉटेलजवळ मद्यपान करत बसला होता. त्याचवेळी काही अज्ञात व्यक्तींनी तेथे येऊन धारदार हत्याराने प्रवीणवर वार केले. या हल्ल्यात प्रवीणचा जागीच मृत्यू झाला.
मयताची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती
प्रवीण एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्यावर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे पूर्ववैमनस्यातूनच हा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्याच्या मृतदेहाजवळ मद्याच्या बॉटल आढळून आल्या आहेत. मयत प्रवीणचे वडील नाशिक पोलीस खात्यात नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच वडील गणपत काकड पोलीस खात्यातून निवृत्त झाले होते. प्रवीणच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे